नाशिक - शहरातील वाढती कोरोना स्थिती लक्षात घेऊन उद्यापासून (बुधवार) लागू करण्यात येत असलेल्या लॉकडाऊन काळात अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळले नाही, तर दंडात्मक कारवाईसोबतच गरज पडली तर बळाचाही वापर करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. शिवाय शहरात ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे.
'गरज पडल्यास पोलीस बळाचा वापर'
शहरातसह जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी उद्यापासून (बुधवार) अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही पुढील 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे.यामुळे 12 मेपासून पुढील 10 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे.मात्र या काळातही काही बेजबाबदार नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने नियोजनाला सुरुवात केली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी कडक करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर गरज पडल्यास बळाचा वापर करण्यात येईल, असा सूचना वजा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 32 हजार 95 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 21 हजार 997 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 32 हजार 095 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 1 हजार 80 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 3 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा -मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन प्लान्ट उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप; चौकशी करण्याची मागणी