नाशिक - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्सची (आयसीएमआर) परवानगी न मिळाल्याने प्लाझ्मा मशीन जिल्हा रुग्णालयातील धूळखात पडले आहे. मात्र याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी जनजागृतीवर भर देणार असल्याचेही मांढरे म्हणाले. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
देशातील मोठ्या शहरांमध्ये प्लाझ्मा थेरेपीद्वारे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यात जिल्हा प्रशासनाने या थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्याची तयारी दर्शविल्याने त्यासाठी पहिले प्लाझ्मा थेरपी मशीन 16 जुलैला नाशिक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. मात्र, त्यात बिघाड असल्याने ते बदलून घेण्यात आले. यानंतर ऑगस्ट महिन्यात प्राप्त झालेले मशीन आयसीएमआरची परवानगी नसल्याने धूळखात पडून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.
नाशिक शहरात प्लाझ्मा थेरपी लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी आयसीएमआर आणि डॉक्टर गोविंद यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही दिवसांत यासाठी परवानगी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, तत्पूर्वी प्लाझ्मा थेरपीसाठी दात्यांना पूर्ण करावे लागणारे निकष आणि जास्तीत जास्त जणांनी प्लाझ्मा डोनेट करावा, याच्या जनजागृतीवर आपण भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या थेरपीसाठी दात्यांना काही निकष पूर्ण करावे लागतात. यात प्लाझ्मा देणारी व्यक्ती कोरोना उपचाराने बरी झालेली असल्यास प्लाझ्मा थेरपी अधिक प्रमाणात यशस्वी होते. यामुळे अशा दात्यांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याच आवाहनही मांढरे यांनी नाशिककरांना केले.