नाशिक - महापालिकेद्वारे एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली प्लास्टिक मुक्त शहर मोहीम थंडावली आहे. त्यामुळे शहरात प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होताना दिसत आहे. मात्र, अधिकारी त्याकडे डोळेझाक करत आहेत.
शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे. आता त्याला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. सुरुवातीला अनेक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेते सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करत आहेत. बाजार समितीमधील मोठे विक्रेतेही प्लास्टिक बंदीला जुमानत नाही. त्यामुळे दुकानासमोर प्लास्टिकचे ढिग तयार झाले आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिक जमा झाल्याने शहरात पाणी तुंबण्याची भिती व्यक्त केली जात आहे. एकीकडे नाशिक शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी पुढे सरसावलेली महापालिका आता का डोळेझाक करत आहे? असा सवाल नाशिककर करत आहेत.