नाशिक - नंदुरबार जिल्ह्याच्या धर्तीवर विभागातील सर्व आदिवासीबहुल भागात आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने एकत्रित शून्य ते सहा वयोगटातील अतितीव्र कुपोषित बालके व अधिक मध्यम तीव्र कुपोषित बालकांची शोध मोहीम राबवावी, असे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
कुपोषित बालकांची योग्य आकडेवारी येणार समोर
विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात विविध विषयांचा अनुषंगाने दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला, त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. ते म्हणाले, या मोहिमेमुळे अशा बालकांची योग्य आकडेवारी समोर येण्यास मदत होऊन बालकांसाठी योग्य त्या उपाययोजना करणे शक्य होईल. तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ व सुरगाणा या आदिवासी तालुक्यात ‘कुपोषण मुक्ती’चा पायलट प्रोजेक्ट लवकरच राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना
सर्व जिल्ह्यांनी शोध मोहिमेसंदर्भात सूक्ष्म नियोजन करून या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करावी. या मोहिमेच्या संनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करून मोहीम सुरू करण्यापूर्वी तालुका स्तरावरील पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. याबरोबरच बालकांची आरोग्य तपासणी तसेच किशोरी मुली गरोदर माता, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी उत्तर महाराष्ट्रतील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केल्या आहेत.