नाशिक - फेसबुकवर तरुणीचे अश्लील फोटो टाकण्याची धमकी देत नाशिकमध्ये पोलीस पुत्राने तरुणीवर वारंवार बलात्कार केला. या संशयित पोलीस पुत्रासह त्याच्या मित्रावर नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या एका मुलीचे २०१५ मध्ये एका मैत्रिणीने तिचा ओळखीचा असलेला यश विजय गांगुर्डे (रा. पोलीस लाइन, नाशिक रोड) याच्या सोबत ओळख करून दिली. या ओळखीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर यश गांगुर्डे याने युवतीला पोलीस लाइनमधील एका पडीक घरामध्ये नेऊन तिच्या भावाला व वडिलांना हानी पोहोचवण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर यशने पुन्हा सीबीएस येथे मुलीवर अत्याचार केला. तर १८ फेब्रुवारी २०१९ ला यश गांगुर्डेचा मित्र गणेश भामरे याने पीडीत युवतीला नाशिकरोडला बोलवून घेतले. त्यानंतर युवतीला सीबीएसवरून सिडको येथील त्रिमूर्ती चौकातील एका फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर ५ मार्चला युवती राहत्या घराजवळ शतपावली करत असताना यशने तिला गाडीवर बसवून घेऊन गेला. रात्रभर पीडित युवती घरी आली नसल्याने पालकांनी चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला. यानंतर पीडित तरूणीच्या पालकांनी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयित यश गांगुर्डे आणि गणेश भामरे यांना अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.