नाशिक - जिल्ह्यातील पिंपळगाव येथील पाचोरे-वणी रोडवरील पेट्रोल पंपावर आज पहाटेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली. ५ ते ६ दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत १ लाख ७ हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाइल घेऊन पोबारा केला. घटनेची नोंद पिंपळगाव पोलीस ठण्यात करण्यात आली आहे.
पिंपळगाव येथील पाचोरे-वणी रस्त्यावर बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल पंप आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी पेट्रोल पंप कार्यालयात झोपलेल्या कर्मचाऱ्यांना दरवाजा उघडण्यास सांगितले. हे आरोपी हिंदी भाषेमध्ये कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत होते. त्यांनी दरवाजा न उघडल्याने दरोडेखोरांनी दगडाने कार्यालयाची काच फोडून आता प्रवेश केला. यावेळी दोन कर्मचारी आत झोपलेले होते. त्यांना मारहाण करण्यात आली.
पंपावरील कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर दरोडेखोरांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये असलेली १ लाख ७ हजारांची रोख रक्कम आणि कर्मचाऱ्यांचे मोबाइल घेऊन तेथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तोंडाला रुमाल बांधलेले दरोडेखोर यामध्ये दिसून येत आहेत.
काही वेळातच शेजारच्या गावातील लोक मदतीसाठी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. या घटनेची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दरोडेखोरांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत.