नाशिक - शहरातील स्मार्ट रस्त्याचे पदपथ (फुटपाथ) हे वाहनतळ बनल्याचे चित्र दिसत असून या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यामुळे नाशिकमध्ये स्मार्ट रस्ते झाले पण, स्मार्ट वाहनतळ कधी होणार, असा सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत.
देशातील स्मार्ट सिटी स्पर्धेत महाराष्ट्रातून नाशिक शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे विकास कामे सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून अशोक स्तंभ ते त्र्यंबक सिग्नल हा प्रमुख रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून तयार करण्यात आला आहे. सिमेंट काँक्रीटच्या या रस्त्यासाठी 60 ते 70 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यावर पदपथ, आकर्षक विद्यूत खांब, बस थांबे, शौचालय उभारण्यात आले आहेत. मात्र, हा रस्ता वाहतुकीच्या विळख्यात सापडला असून वाहनधारकांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने शेकडो वाहने स्त्यावरील पदपथांवर लावली जात आहेत. तसेच चारचाकी वाहने पदपथालाजवळच लावली जात असल्याने या रस्त्यावरील वाहतूक कोंडीला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे.
शासकीय कार्यालयामुळे वाहनांची मोठी गर्दी
अशोक स्तंभ ते सिबीएस हा 500 मीटरचा रस्ता अतिशय वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने मुख्य बस स्थानक, बिटको शाळा आणि महाविद्यालयात, कन्या शाळा, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, हुतात्मा स्मारक यासारखे अनेक वास्तू असून या रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कामानिमित्त रोज शेकडो नागरिक येत असतात. या भागात वाहनतळ नसल्याने नाईलाजाने नागरीक वाहने पदपथावर लावतात.
पोलीस आयुक्त म्हणतात, शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे आमची जबाबदारी नाही
नाशिक शहरात सध्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून वाहतूक पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. यामुळे वाहनधारक देखील बिनधास्तपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी पोलिसांची नसून ती परिवहन विभागाची असल्याचे म्हणत आपले हात झटकले आहे. तसेच विना हेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करण्याची जबाबदारी देखील परिवहन विभागाची असल्याचे पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे. वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाला मनुष्यबळ लागल्यास आम्ही पुरवू, असे पत्रही पोलीस आयुक्त कार्यालयाकडून परिवहन विभागाला देण्यात आले आहे.
नो पार्किंगच्या ठिकाणी लावली जाताहेत वाहने
नाशिक शहरात मागील एक वर्षापासून नो पार्किंगमधील वाहने उचलण्याचे कंत्राट बंद आहे. यामुळे वाहनधारकही बिनधास्तपणे वाहने रस्त्यावर उभी करत असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील शालिमार, एमजी रोड, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, मेनरोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी, निमाणी आदी भागात वाहनधारक नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावत आहेत.
हेही वाचा - आंबे वरखेडा येथील दोन शाळकरी मुलांनी तयार केली इलेक्ट्रिक सायकल