मनमाड (नाशिक) -कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. नांदगाव तालुक्यातील नांदगाव-चाळीसगाव चेक पोष्टवर कर्तव्यावर असरणाऱ्या २ पोलिसांवर पोलीस पाटील यांच्यासह एका पत्रकाराने टोळक्यासह येऊन मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनांची तपासणी करणाऱ्या २ पोलिसांवर १५ ते २० जणांच्या टोळक्याने हल्ला करून मारहाण केली. त्यात अनिल शेरेकर आणि प्रदीप बागुल या पोलिसांना दुखापत झाली असून त्यांना नांदगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नांदगांव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांच्या वाहनांची तपासणी केल्याचा राग मनात धरून एका पत्रकाराने पोलीस पाटलांसह गावातील लोकांना गोळा करत टोळक्याने पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी पोलीस पाटील आबा दादा शिंदे, पत्रकार गोकुळ मंडळ, युवराज शिंदे, धोंडीराम कुट्टीवाला, दत्तू माळी, सुनील आहेर यांच्यासह १० ते १५ जणांविरोधात विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
कोरोनामुळे बहुसंख्य पोलीस कर्मचारी हे जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर दिवसरात्र उभे आहेत. काही खोडसाळ लोकांच्या चुकीच्या वागण्याने त्यांच्यावर हल्ले करण्यात येत आहेत. अशा घटना घडू नये, यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य करावे तसेच शासनाने अशा आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.