नाशिक - मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी जम्मू-काश्मीर येथून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंढरीनाथ राघो चौधरी, असे या जवानाचे नाव आहे. या जवानावर त्यांच्या मूळी गावी बागलाण तालुक्यातील मुळाणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरीनाथ चौधरी हे गेल्या 10 वर्षापासून केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावत होते. 24 फेब्रुवारीला मुलगा आयुषचा प्रथम वाढदिवस असल्याने 10 दिवसांची रजा टाकून चौधरी हे आपल्या गावी मुळाणे येथे आले होते. मुलाचा वाढदिवस कुटुंबियांसमवेत धुमधडाक्यात साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंढरीनाथ चौधरी हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कौतिकपाडे येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्यांना गंभीर इजा झाली. त्यानंतर पंढरीनाथ यांच्यावर सटाणा येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची वार्ता पंचक्रोशीत समजताच परिसरातील नागरिकांचा मोठा जनसमुदाय त्यांच्या घराजवळ जमला होता.
हेही वाचा - नांदगाव तालुक्यात बंजारा समाजाच्यावतीने धुंड साजरी; बालकांचे केले नामकरण
संध्याकाळी 4 वाजता मुळाणे येथील स्मशानभूमीत पंढरीनाथ चौधरी यांचा 1 वर्षाचा मुलगा आयुषने वडिलांना अग्नी देऊन त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी काढून आलेल्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने आई सखुबाई, पत्नी अर्चना व मुलगा आयुष यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. हे दृश्य पाहून उपस्थितांपैकी अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार नेरकर, सुभेदार मेजर रवींद्र अहिरे, बागलाण अकॅडमीचे संचालक आनंदा महाले, कारगिल युद्धातील सेवानिवृत्त जवान उत्तम भामरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - नाशकात धुळवडीनिमित्त वीरांना नाचवण्याची 300 वर्षांपासूनची अनोखी परंपरा आजही कायम...