नाशिक - मनमाडच्या वैभवशाली परंपरेत भर घालणाऱ्या अंकाई-टंकाई या जोडगळी किल्ल्याला कोरोनाचा फटका बसला असून गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भ्रमंती करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. या आशयाचा बोर्ड डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आला आहे.
मनमाडपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला अंकाई टंकाई हा जोडगोळीचा किल्ला आहे. या किल्ल्यावर नाशिकसह अहमदनगर, औरंगाबाद आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यातील दुर्गप्रेमी देखील येत असतात. सुटीच्या दिवसांत डोंगरावर अक्षरशः जत्राच भरते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर किल्ल्यावर जाण्यासाठी मनाई करण्यात आलीय. डोंगरावर जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध काटे लावले असून अन्य मार्ग देखील बंद करण्यात आले आहेत.
अंकाई किल्ल्यावर जाण्यासाठी दुर्गप्रेमीचा ओढा कायम असतो. मात्र आता कोरोनामुळे जाण्यासाठी मनाई असल्याने हिरमोड झाल्याचे दुर्गप्रेमी सांगत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणात ट्रेकींगचे नियोजन करण्यात येते. अनेक ठिकाणी गिर्यारोहकांचे ग्रुप किल्ल्यांची भ्रमंती करण्यासाठी बाहेर पडत असतात. मात्र, आता संचारबंदीमुळे यंदा गिर्यारोहकांमध्ये नाराजी आहे.