नाशिक - पाकिस्तान हनी ट्रॅपच्या माध्यमातून भारतीय सुरक्षा विभागातील गोपनीय माहिती मिळवण्यासाठी नाशिकमध्ये एजंट तयार करण्याचे काम करत आहे, अशी धक्कादायक माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी महिलांशी बोलणे टाळावे, असे आवाहन 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून केले आहे.
नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसात पाकिस्तान हेरगिरी करत असल्याचा दोन घटना समोर आल्या आहेत. यातील एका प्रकरणात भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीतील एका कर्मचाऱ्याने हनी ट्रॅपच्या माध्यमातून पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात एका मजुराने देवळली कॅम्प येथील लष्कर हद्दीचे फोटो पाकिस्तान येथील एका व्हॉट्स अॅप ग्रूपवर टाकल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास एटीएस (दहशतवादी विरोधी पथक) करत आहे. पाकिस्तान आता हनी ट्रॅपच्या माध्यमातून नाशिकच्या नागरिकांना लक्ष्य करून भारतातील संवेदनशील विभागाची हेरगिरी करून माहिती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणत अॅक्टिव्ह झाली असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर कुठल्याही अनोळखी महिलेसोबत बोलू नका, अन्यथा आपणही हनी ट्रॅपमध्ये अडकून आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हनी ट्रॅप म्हणजे काय..?
पाकिस्तान हेरगिरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हनी ट्रॅपचा वापर करत आहे. यात सोशल मीडियावरून अनोळखी महिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. बऱ्याच दिवस तुम्हाला आवडतील अशा गोष्टी तुमच्या सोबत बोलते. नंतर तुमच्या भागातील संवेदनशील माहिती सांगण्यास किंवा पाठवण्यास सांगते. आपण या महिलेच्या जाळ्यात अडकलो आणि भारतीय सुरक्षेच्या संवेदनशील माहिती महिलेला दिली तर आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे शक्यतो अनोळखी महिलांची फ्रेड रिक्वेस्ट स्वीकारू नका, अनोळखी व्यक्तीला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करू नका.
हेही वाचा - सुट्टीवर असतानाही नाशिकच्या पोलिसाने दाखवली चतुराई, पत्नीच्या मदतीने अट्टल चोरटे गजाआड