नाशिक (येवला)- भारतीय डाक विभागाच्या पाकिटावर आता येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी दिसणार असून, पैठणीचा स्पेशल कव्हर असलेले पाकीट आता भारतभर पोहोचणार आहे.
येवल्यातील जगप्रसिद्ध पैठणी आता भारतीय डाक विभागाच्या पाकिटावर देखील दिसणार असून, आज येवला पैठणी नगरीतच या पैठणी पदर असलेल्या डाक पाकिटाचे अनावरण डाक अधीक्षक नितिन येवला, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर तसेच पैठणी विणकर यांच्या हस्ते करण्यात आले. पैठणी साडीला देखील 'जी आय' मानांकन प्राप्त झाल्यामुळे या पैठणी साडीचा पदर डाक विभागाच्या स्पेशल कव्हर येणार आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या ज्या गोष्टींना 'जी आय' मानांकन प्राप्त होते अशा सर्व गोष्टी डाक पाकिटावर छपाई केली जात असते. त्यामुळे आता संपूर्ण भारतभर 'जी आय' मानांकन असलेली पैठणी डाक विभागाच्या स्पेशल कव्हरवर दिसणार आहे. यावेळी डाक विभागाचे अधीक्षक नितीन येवला, डाक निरीक्षक चांदवड राजेंद्र वानखेडे, डाक निरीक्षक मनमाड पंकज दुसाने, येवला पोस्ट मास्टर बी.आर. जाधव, पैठणी उत्पादक उपस्थित होते.