नाशिक - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबधितांचा आकडा वाढत आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. असे असताना शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणू लागला आहे. उपचार प्रक्रियेत महत्वाचे घटक असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची प्रकृती अधिक ढासळत असून त्यांचा मृत्यू होत असल्याचा आरोप नातेवाइकांकडून होत आहे. त्यामुळे, शहरातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती नेमकी काय आहे, यावर ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.
जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा ४५ हजारांवर जाऊन पोहोचला असून ९५०हून अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच, रोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. एकीकडे, डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असताना दुसरीकडे, त्यांना ऑक्सिजनची समस्या भेडसावत आहे. नाशिकच्या सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत असून रुग्णांचा जीव गुदमरायला लागला आहे. नाशिकमध्ये नियमित मागणीपेक्षा ऑक्सिजनची मागणी ५ पट वाढली असून मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणांहून होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नसल्याने नाशिक शहरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. याबाबत पुरवठेदार देखील हतबल झाले आहेत.
नाशिक जिल्हा रुग्णालयाला रोज २५ ते ३० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. मात्र, आता हा आकडा ४०० सिलिंडरवर गेला आहे. महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १०० सिलिंडरची गरज असते, त्यात इतर खासगी रुग्णालयांची संख्या वेगळीच आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नाशिककर करत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस
मुंबई, पुणे येथील उत्पादकांकडून लिक्विड ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी पुरवठादारांनी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पुरवठादार कंपन्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, अगोदरच मोठी मागणी आणि वेगवेगळ्या भागातील राजकीय दबाव आल्याने कंपन्यांनी नोटिसांना दाद दिली नाही.
जिल्हा रुग्णालयात पुरेसा पुरवठा होतो
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना काळात ऑक्सिजनची मागणी ५ पट वाढली आहे. पुरवठादारांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने भविष्यात ऑक्सिजनमध्ये अनियमिततेचा फटका बसू नये यासाठी २० केएलटी टाकी बांधली जात आहे. त्यामुळे, ७ ते ८ दिवस ऑक्सिजनची गरज भासणार नाही.
हेही वाचा- नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी मशीन बंदच...