नाशिक - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, दिलासा मिळाला आहे. परंतु येणारी संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बाल कोविड केअर रुग्णालय व हाय डिपेंडन्स रुग्णालय अशा द्विस्तरीय कोविड रुग्णालयांचे नियोजन करण्यात येत आहे. लहान मुले कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बाधित होणार नाहीत, याची काळजी पालकांनी घ्यावी अशा सुचाना, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
'जिल्ह्यात नवीन 62 ऑक्सिजन प्रकल्प'
जिल्ह्यात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच, ऑक्सिजनची कायमस्वरूपी व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागात नवीन 62 ऑक्सिजन प्रकल्प तयार करण्यात येत आहेत. या परिस्थितीत कमी होणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. या उद्योगांना देखील आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुवरठा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.
'95 टक्के मुलं घरीच बरे होतील'
'ब्रेक द चेन'अंतर्गत लागू करण्यात आलेले लेव्हल तीनचे सर्व निर्बंध सध्या जसेच्या तसे लागू राहतील. तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी पालकांनी घ्यायची आहे. लहान मुले बाधीत झालेचं, तर केवळ 5 टक्केच मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागणार आहे. बाकी, 95 टक्के मुलं ही घरीच बरे होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याचे भुजबळानी यावेळी सांगितले आहे.