नाशिक - भाजपमध्ये येण्यासाठी विधानसभेत विरोधकांच्या आमच्या मागे रांगा लागल्या आहेत, असे विधान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले. आमचे काहीतरी करा अशी सतत मागणी पहिल्या बाकावर विधानसभेत बसणारे विरोधक करत आहेत, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आज शहरात आयोजित महिला मोर्चा कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते.
येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे. गेल्या 50 वर्षात मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठे मोर्चे आमच्या काळात निघाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना न्याय देतील अशा त्या मोर्चे काढणाऱ्यांना विश्वास होता. आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न लावून धरला. त्यामुळेच आज मराठा बांधवांचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभेत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी झाले आहे. राज्यात काँग्रेसची केवळ एकच जागा आली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही अवस्था बिकट आहे. काँग्रेसच्या तीन नेत्यांचे तोंड तीन दिशेला आहेत. त्यांचा विरोधीपक्ष नेताही भाजपमध्ये आला आहे. अजूनही अनेक जण येण्याच्या तयारीत आहेत. आता काँग्रेसमध्ये राहायला कोणीही तयार नाही. तसेच या पक्षाचे अध्यक्षपद सांभाळण्यासही कोणी समोर येत नसल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी केली.