नाशिक Onion Traders Strike Back: शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी दोन पावलं मागे घेत आंदोलन मागे घेतले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. नाशिक जिल्ह्यासह अहमदनगरात व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लिलाव 13 दिवसांपासून बंद केले होते. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावे ही प्रमुख मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यामुळे राज्यातील राजकारण देखील पेटले होते. अखेर नाशिकमधील कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटली आहे. मंगळवारपासून नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत.
व्यापाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय: शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी दोन पावलं मागे घेत आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांच्या कोर कमिटीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय स्तरावर बैठकही झाली. मात्र, कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं होतं. मात्र, शेतकऱ्यांचे वाढते नुकसान लक्षात घेऊन आता कांदा खरेदी-विक्री सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
कोटींची उलाढाल ठप्प: निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे, बाजार समितीतील मार्केट फी अर्धी करावी,आदी मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी जिल्ह्याभरात कांदा लिलावावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे गेल्या 13 दिवसात जिल्ह्यात कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. सर्व मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत कांदा लिलाव होणार नाही, असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला होता. शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा निम्म्याहून अधिक खराब झाला आहे. जो शिल्लक आहे त्याला विकण्याची सध्या गरज आहे. अन्यथा तो देखील खराब होऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांना असल्याने ते लिलाव कधी सुरू होतील याची ते वाट पाहत होते. आता मंगळवारपासून लिलाव सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा:
- Onion Traders Closure: लासलगाव कांदा व्यापारी बंदवर ठाम, परवाने रद्द करून भूखंड जमा करण्याची कारवाई केली जाणार..
- Strike of Onion Traders : कांदा व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदचा शेतकऱ्यांना फटका; नाशिकातील सर्व बाजार समित्या बंद
- Onion Seller Farmers : नाफेडने कांदा खरेदीसाठी लादल्या जाचक अटी; शेतकरी अडचणीत