लासलगाव ( नाशिक) : केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप आज मागे घेण्यात आलाय. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत कांदा व्यापारी असोसएशनची बैठक पार पडली. उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यालयात देखील सभापती, संचालक व कांदा व्यापाऱ्यांची बैठक झाली. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आश्वासनानंतर अखेर तोडगा निघाला.
भारती पवार यांच्या आश्वासनानंतर संप मागे : कांदा लिलावात सहभागी न झाल्यास व्यापाऱ्यांचे कांदा खरेदी-विक्रीचे परवाने रद्द करण्याचा इशारा नाशिक उपजिल्हा निबंधक फयाज मुलाणी यांनी दिलाय. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याच्या लिलावाचे कामकाज पूर्ववत करण्याचे व्यापाऱ्यांना आदेश दिले आहेत. कांदा लिलाव बंद दरम्यान पर्याय व्यवस्था उभी करावी. जे व्यापारी कांदा लिलावात सहभागी होणार नाही, अशा व्यापाऱ्यांवर १९६३ व त्याखालील नियम, १९६७ नुसार कारवाई करण्यात येईल. अन्यथा त्यांचे कांदा खरेदी विक्रीचे परवाने रद्द करण्याचे आदेश या पत्रात दिले आहेत. लासलगाव बाजार समितीच्या वतीने व्यापारीशी चर्चा करून कांदा लिलावाचे बंद पडलेले कामकाज लवकर सुरू (onion strike withdraw) करण्यात येणार आहे.
दोन दिवस कांद्याचा प्रश्न पेटला : कांदा प्रश्न काही दिवस चिघळल्याचे दिसून आले. नाशिकमधील शेतकऱ्यांनी मनमाड येवला मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. महाराष्ट्र किसान सभेनं देखील या बंदला पाठिंबा दिला होता. केंद्रानं घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कांदा प्रश्नावरून खासदार अमोल कोल्हे यांनी देखील कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं आहे. त्यांनी शहरात येणाऱ्या मंत्र्यांचं स्वागत गळ्यात कांद्यांचे हार घालून करा, असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय.
दादा भुसेंचं वक्तव्य : माजी कृषीमंत्री दादा भुसे यांनी कांदे परवडत नसतील, तर खाऊ नका असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. या वक्तव्यावरून वेगवेगळ्या स्तरांतून त्यांच्यावर टीका झाली होती. राजू शेट्टी यांनी देखील कांद्याच्या भावावरून सरकारवर निशाणा साधलाय. कांद्याचा भाव 30 रूपये करण्याची मागणी त्यांनी केलीय. सरकारची ही प्रवृत्ती बरोबर नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा :