मनमाड (नाशिक) - केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्या नंतर व्यापाऱ्यांनी पुकारलेला अघोषित संप पाच दिवसांनंतर आज (शुक्रवारी) मागे घेण्यात आला. यानंतर गेल्या पाच दिवसापासून बंद असलेला कांदा लिलावाला आजपासून सुरुवात करण्यात आली. मात्र, कांद्याची आवक कमी होती.
शेतकऱ्यांना माहिती नसल्याने परिणाम -
अनेक शेतकऱ्यांना कांदा लिलाव सुरू झाल्याची माहिती नसल्याने आवक कमी झाली. एकीकडे आवक कमी झालेली असताना दुसरीकडे मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे 200 रुपयांची घसरण झाली. तसेच केंद्र शासनाने कांदा बियाणांची निर्यातबंदी केली असली तरी याचा काहीच फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कांदा बियाणे निर्यातबंदी चार महिने आगोदर केली असती तर त्याचा फायदा झाला असता असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
कोट्यवधीची उलाढाल होती ठप्प -
आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव आणि अन्य बाजारपेठेत मागील चार दिवसांपासून कांदा लिलाव शेतकरी आणि व्यापार्यांनी बंद पाडले होते. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी व 25 मेट्रिक टन साठवणूक या निर्बंधांच्या विरोधात शेतकरी व व्यापार्यांनी वज्रमूठ उभारत लिलाव बंद पाडले. त्यामुळे लिलावाच्या माध्यमातून होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली होती. कांदा लिलाव बंद झाल्यामुळे बाजारपेठेत कांदा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे कांद्याचे दर 70 ते 80 रुपये किलोवर पोहोचला आहेत. परिणामी सर्व सामान्य जनतेच्या स्वयंपाकगृहातून कांदा हद्दपार झाला होता.
मुख्यमंत्री केंद्र सरकारसोबत करणार चर्चा -
कांदा उत्पादकांचे प्रश्न आणि अडचणी मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आले आहेत. आज कांदा लिलाव सुरू करण्यात येत आहे, याबाबत मुख्यमंत्री आज (शुक्रवारी) केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.