नाशिक - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना देखील अनेक नागरिक हे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचं समोर येत आहे. यात गेल्या काही दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
274 जणांवर कारवाई, 1 लाख 74 हजार दंड वसूल
शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातल आहे. दररोज शहरामध्ये एक हजाराहून अधिक बाधित आढळून येत असताना देखील नाशिककर या परिस्थितीचं गांभीर्य समजून न घेता बेजबाबदारपणे रस्त्यांवर फिरत असल्याचं पोलिसांच्या कारवाई मधून समोर येत आहे. राज्यासह जिल्ह्यातील प्रादुर्भाव नियंत्रणात यावा म्हणून शासनाने 15 मे पर्यंत संचारबंदी घातली आहे. मात्र असे असले तरी अनेक नागरिक रस्त्यांवर विनाकारण फिरत असल्याचं आढळून येत आहे. यात मास्कचा वापर न करणे सोशल डिस्टंसिंग न पालणे तसेच नियमबाह्य दुकाने सुरू ठेवणे यांसह विविध नियमांचे उल्लंघन केल्याने शहर पोलिसांनी 274 जणांवर कारवाई करत 1 लाख 74 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिकेच्या सोळा कारवाईमध्ये 26 हजार रुपयांचा दंड
तर महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या सोळा कारवाईमध्ये जवळपास 26 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दररोज पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर दंडाची रक्कम वसूल केली जात असल्याने नाशिककर अजूनही बेजबाबदारपणे विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे अधोरेखित होत आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवण्याच्या या लढाईमध्ये नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 36 हजार रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (मंगळवार) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 2 लाख 94 हजार 146 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 36 हजार 11 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 3 हजार 600 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.