नाशिक - दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाटा शिवारात नाशिक-पेठ रस्त्यावर दिंडोरी पोलिसांनी 53 लाख रुपयांच्या गुटख्यासह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक-पेठ रस्त्यावर एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची गोपीनीय माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा लावून गोळशी फाटा शिवारात लाल रंगाचा मालवाहू ट्रक अडवला. या वाहनाची तपासणी केली असता, त्यात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने बंदी घाललेला सुगंधित गुटखा व सुगंधित पानमसाला तंबाखू असा 53 लाख रुपयाचा माल आढळला. हा सर्व माल सिल्वासा येथून पेठमार्गे नाशिककडे नेला जात होता. या प्रकरणी कर्नाटक राज्यातील दत्तात्रय रामलिंग जामदार (वय 38 रा.सस्तापूर, ता. बसव जि. बिदर) याच्या विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, सचिन नवले तसेच पोलीस हवालदार धनंजय शिलवाटे, योगेंद्रसिंग राठोड, युवराज खांडवी, युवराज चव्हाण, मधुकर बेंडकूळे करत आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही झाली होती मोठी कारवाई -
राज्यात मागील कित्येक वर्षे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री-उत्पादनावर बंदी आहे. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कशी जोरात सुरू आहे, हे वारंवार अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)च्या कारवायांतून समोर आले आहे. सोमवारी एफडीएने अँटॉप हिल येथे छापा टाकत तब्बल 12 लाख 91 हजार 954 रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. तर याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.