नाशिक - जिल्हापरिषदेमध्ये लोकायुक्तांच्या नावे आरोग्य पर्यवेक्षक व ज्युनियर क्लार्कपदी नेमणुकीचे बनावट नियुक्तीपत्र व ओळखपत्र तयार करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच उमेश बबन उदावंत (रा. जेलरोड) विरोधात जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासन अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
प्रशासन अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघड..
नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणारे हितेंद्र मनोहर नायक यांना आरोग्य पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नी अक्षदा परमसिंग यांना ज्युनियर क्लार्क म्हणून लोकायुक्तांच्या नावाने नियुक्तीपत्र मिळाले होते. नियुक्तीपत्र मिळाल्याने हितेंद्र नायक हे रुजू होण्यासाठी जिल्हा परिषदेतील दाखल झाले. मात्र सन 2016 पासून जिल्हा परिषदेत सरळसेवेने भरती झालेली नसल्याने हे बोगस नियुक्तीपत्र असल्याचे प्रशासन अधिकारी प्रकाश थेट यांच्या लक्षात आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता नायक यांच्या पत्नीच्या नावेही ज्युनियर क्लार्क पदाचे नियुक्तीपत्र आढळले. त्यांना नियुक्तीचे आदेश कोणी दिले याची चौकशी केली असता उमेश बबन उदावंत (रा. जेलरोड) यांनी ही नियुक्ती पत्रे दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या दोघांना नोकरीवर रुजू करण्यासाठी उदावंत स्वतः जिल्हा परिषदेत हजर होता.
आरोपीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल..
उदावंत याची चौकशी केली असता त्याच्याकडे महाराष्ट्र सरकार, जिल्हा परिषद नाशिक हेल्थ सुपरवायझर असे ओळखपत्र आढळून आले. हा प्रकार प्रशासन अधिकारी थेटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी नियुक्तीपत्राबाबत अधिक चौकशी केली असता तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांची संगणकीय सही तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्या सहीने बनावट नियुक्तीपत्र तयार केल्याचे आढळले. त्यामुळे थेटे यांनी उमेश बबन उदावंत याच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठा घोटाळा असण्याचा संशय..
या प्रकरणामुळे लाखो रुपये घेऊन बनावट सरकारी नोकरी देणारे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे. यामधून बेरोजगारांचा गैरफायदा घेत शासनाची फसवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे आरोपीने राजमुद्रेचा आणि लोकयुक्तांच्या नावाचा उघडपणे गैरवापर केला आहे. त्याची चलाखी पाहून प्रशासन देखील चक्रावले आहे. या नोकर भरती घोटाळ्यात 180 बेरोजगारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याचा संशय असून, पोलिसांना आणि प्रशासनाला आरोपींनी जणू खुले आव्हानच दिले आहे.