नाशिक- 1939 सालची घटना. दिवस-रात्र नुसता पाऊस कोसळत होता. अखंड पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. पंचवटी येथील सरकार वाड्याच्या 11 पायऱ्या पाण्यात बुडाल्या होत्या. थेट चांदवडकर लेन पर्यंत पाणी आले होते. महापुरामुळे दुतोंड्या मारुती बुडाला होता. नारोशंकराच्या घुमटावर काही साधू जीव वाचवण्यासाठी चढले होते. परंतु पाणी वाढतच गेल्यामुळे हे साधू महापुरात अडकून गेले होते. त्यांना वाचवायचं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालायचा, अशा वेळेस जीवाची पर्वा न करता चिवडा उद्योगाचे संचालक तसेच अभिनेता आणि पैलवान असलेले धर्मराज पाटील यांनी त्यांचे सहकारी साथीदार मोहन प्यारे यांच्यासमवेत विक्टोरिया(आताचा अहिल्याबाई होळकर) पुलावरून उड्या घेतल्या आणि पोहत नारोशंकराच्या मंदिराचा घुमट गाठला. अथक प्रयत्न करून ह्या दोघांनी साधूंना वाचवले.
पुरात येणाऱ्या भोवऱ्याला चुकवून पोहणे म्हणजे साक्षात मृत्यूला चकवा देणे. मात्र अशा परिस्थितीत धर्मराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले धैर्य आणि आत्मविश्वासामुळे त्या काळी अनेकांना जीवदान मिळाले. या शौर्यासाठी ब्रिटिश सरकारकडून सोन्याचा मुलामा असलेला भोपळा धर्मराज पाटील यांना बक्षीस म्हणून देण्यात आला होता. इतक्या वर्षांनी आलेल्या महापुरामुळे आज धर्मराज पाटील यांच्या आठवणींना मुलगी योजना बुरकुले यांनी उजाळा दिला...