नाशिक - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता त्यावर होणाऱ्या खर्चातून चिमुकल्याने मानवसेवा वृद्धाश्रमात एक महिना पुरेल एवढ्या किराणा साहित्याचे वाटप केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 हजार 111 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
कोरोनाचा सामना करण्यासाठी गरजूंना मदत म्हणून सरकारसोबत अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत. अशाच सामजिक कार्यात सहभागी होत, शाहू देवरे या चिमुकल्याने सहावा वाढदिवस साजरा न करता त्यावर होणाऱ्या खर्चातून मानव सेवा वृद्धाश्रम येथे गहू, तांदूळ, साखर, मसूर डाळ, शेंगदाणे, तेल, तूरडाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
आम्ही मुलाचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता कोरोना विरोधात लढण्यासाठी ही छोटीशी मदत करत असल्याचे शाहूचे वडील वैभव देवरे यांनी सांगितले. तसेच देवरे कुटुंबाने यापुढे जात सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला 11 हजार 111 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील चिमुकल्या शाहूचे कौतुक करत, अशा संकटप्रसंगी नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले.