दिंडोरी (नाशिक) - गुरु पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथील स्वामी समर्थाचे आद्यपीठ संबोधल्या जाणाऱ्या स्वामी मंदिरात व्यासपूजेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरात भाविकांना येण्यास मज्जाव करत घरातूनच पूजा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे यावेळी मंदिरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्रामार्फत गुरुपोर्णिमाचा कार्यक्रम घरच्या घरी साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच भाविकांनीही यावेळी घरामध्ये नामसाधना व ध्यानसाधना करण्यास केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. दिंडोरीनंतर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थाचे सर्वात मोठे केंद्र असून तेथेही कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी टाळून कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात(ग्रामीण)सध्या एकूण1043 कोरोना बाधित रुग्ण आहेत. शनिवारी ८५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.