नाशिक - वर्षभरात वनविभागात बिबट्याच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर वर्षभरात 11 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. धक्कादायक म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 18 बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ऊस तोडणीमुळे बिबटे मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत.
सध्या राज्यभरात सर्वच जिल्ह्यात ऊस तोडणी सुरू असून या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. ऊत सोड सुरू असताना हे बिबटे बाहेर निघून मनुष्यावर हल्ला करतात. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याचे व बिबट्या दिसताच वनविभागाला संपर्क करण्याचे आवाहन पंकज कुमार गर्ग उपवनसंरक्षक नाशिक विभाग यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यात अद्यापही तीनशे-चारशे बिबटे
नाशिक जिल्ह्यात तीनशे-चारशे बिबटे असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. गेल्या वर्षभरात नाशिक विभागातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यात वनविभागाने 11 बिबट्यांना जेरबंद केले आहे. या ठिकाणच्या बिबट्यांना बोरवली आणि जुन्नर रेस्क्यू सेंटर येथे पाठवण्यात आले आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत 18 बिबट्यांचा विविध दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर अपघातात 5 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक कारणामुळे 9 तर 3 विहिरीत पडून, रेल्वे धडकेने 1 असे एकूण 18 बिबट्याचा वर्षभरात मृत्यू झाला आहे.