नाशिक - जिल्हाभरात कोरोनामुळे ग्रामीण भागातील उद्योगधंदे थांबले आहेत. शेतमजुरी, कष्टकरी आणि विविध कामांवर रोजंदारीने काम करणारे हात उपासमारीने हतबल झाले आहेत..ह्या दुर्दैवी परिस्थितीत अनेक अनेक सामजिक संस्था पुढे येत आहेत. अशाच एक श्री स्वामी समर्थ गुरुपीठ सामाजिक संस्थाने आदिवासी भुकेलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहत लॉकडॉऊनमध्ये उपसमारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण ह्या तालुक्यातील 1 हजार 200पेक्षा जास्त आदिवासी वाड्यापाड्यांत जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्वामी समर्थ गुरुपीठ संस्थेच्या माध्यमातून टाळेबंदी काळात 20 टक्के अध्यात्म आणि 80 टक्के समाजोपयोगी कार्य करण्यात येत आहे. आतापर्यंत 35 हजारांपेक्षाही जास्त गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य पोहोचविण्यात गुरुपीठ संस्थेच्या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण हे तालुके नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून परिचित आहेत. ह्या तालुक्यात विविध आदिवासी कुटुंबांची उपजीविका शेतमजुरी आणि रोजंदारी कामावर अवलंबून आहे.
लॉकडाऊन काळात गेल्या 2 महिन्यापासून ह्या कुटुंबांची पोटाची भ्रांत वाढत चालली होती. उपासमारीचे संकट कोरोनापेक्षा भयाण असल्याने ही कुटुंबे आपल्या अश्रूंना घरातच वाट करून देत होते. मदत करणाऱ्या विविध संस्था अतिदुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहचत नव्हत्या. परिणामी ह्या संकटांचा सामना करणारे आदिवासी कुटुंब हवालदिल झाले होते. ह्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ संस्थेचे सचिव चंद्रकांत मोरे आदिवासी गरजू कुटुंबाच्या मदतीला धावले.
गुरुपीठ संस्थेच्या सेवेकऱ्यांसह नाशिक जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने सर्व आदिवासी तालुक्यांतील 1 हजार 200 पेक्षा जास्त वाड्यापाड्यांत जीवनावश्यक अन्नधान्याचे कीट, गहू, तांदूळ, रवा, साबण आदी साहित्य घरपोच वाटप केले. किमान 35 हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना ह्याचा फायदा झाल्याचा अंदाज आहे. वाटपप्रसंगी शासनाच्या सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनीटायझर वापर यासह विविध नियमांचे कटाक्षाने पालन करून जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेषत्वाने साहाय्य घेण्यात आले.