नाशिक - जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नाशिकच्या विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न नियोजनात्मक पद्धतीने सोडविण्यावर भर देणार तसेच असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिली.
विभागाचा आढावा घेत असताना प्राधान्याने विभागातील कोरोनाची स्थिती जाणून घेण्यात येईल. ज्या ठिकाणी पायाभुत सुविधा कमी असतील त्या ठिकाणी रुग्णांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शेतकरी पीक कर्ज वाटप व महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत, विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी व्यक्त केले.
शासकीय कामांना गती देण्यासाठी घेणार जिल्हानिहाय आढावा -
विभागातील शासकीय कामांना व शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांना गती देण्यासाठी पुढील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांना भेट देवून त्यांचा जिल्ह्याचा आढावा घेवून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी दिली.
तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे गतिमान करण्याच्या सुचना -
तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे गतिमान करण्याबाबत राधाकृष्ण गमे यांनी उपायुक्त व सर्व विभाग प्रमुखांना सूचित केले. तसेच प्रत्येक कामाचे नियोजन 3 टप्प्यात करुन त्यामध्ये दैनंदिन आवश्यक कामे त्याच दिवशी निकाली काढाण्यात यावीत, आठवड्याची कामे आठवड्यात तर महिन्याभराचा कालावधी असलेली कामे महिन्याभरात निकाली काढावीत. तसेच प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या विभागाच्या कामाच्या माहिती व यापुर्वी झालेल्या बैठकांचे इतिवृत्त सादर करण्याच्या सूचनाही गमे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
राधाकृष्ण गमे यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ -
नवनिर्वाचित विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याआधी नाशिक महानगरपालिका आयुक्तपदाचा तब्बल दीड वर्ष यशस्वीरित्या कार्यभार सांभाळला आहे, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकला देशात अकराव्या स्थानी नेण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. तसेच नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तसेच नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी लिलया पार पाडल्यानंतर त्यांना नाशिक विभागीय महसूल आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी पार पाडत असतांना तळागाळात जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून सर्वांनाच परिचित असलेले राधाकृष्ण गमे यांची पालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर त्यांच्या बदलीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. मात्र त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांच्यावर महाराष्ट्रातील 6 प्रमुख जिल्ह्यांची जबाबदारी टाकत त्यांना नाशिक विभागीय महसूल आयुक्त पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद, सोलापूर जिल्हाधिकारी पदाचीही जबाबदारी पार पाडली आहे.
दरम्यान, त्यांनी कोरोना काळात तळागाळात जाऊन केलेले काम असो की स्मार्ट सिटी, स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकला जगाच्या नकाशावर झळकवण्यात घेतलेली मेहनत अशा सर्वच कामांनी ते चर्चेत आले. त्यांच्या याच कामाची दखल घेत शासनाने त्यांना आता नाशिक विभागीय महसूल आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारताच नाशिक विभागातील नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात दौरा करत विभागातील महसूली कामांना गती देणार असल्याचे सांगितले तसेच, कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हानिहाय बैठकीचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.