नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव पाठोपाठ आता येवल्यातील कोरोनाबाधित रुणाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी तालुक्यात आणखी 6 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 31 वर जाऊन पोहचली आहे.
शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने येवलेकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. येवल्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने ग्रामीण भागातील जनता धास्तावली आहे. रविवारी आलेल्या अहवालात ग्रामीण भागातील पाटोदा गावातील 2 जण पॉझिटिव्ह आले असून शहरातील 4 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून 68 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले होते. मात्र, आज एकाचवेळी 6 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याने शहरवासिय धास्तावले असून आता उरलेले अहवाल काय येतात, याकडे येवलावासियांचे लक्ष लागले आहे.