नाशिक - तीन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांनी त्यांच्या राज्यात आंदोलन करून देखील सरकार प्रश्न सोडावीत नसल्याने अखेर आंदोलक शेतकरी दिल्लीत आले. एकीकडे कोरोनाचा कहर, कडाक्याची थंडी, पाऊस या सारख्या कठीण परिस्थितीत दोन महिन्यातून अधिक काळापासून शेतकरी संयमाने आंदोलन करत आहेत. या परिस्थितीत जवळपास ८० हुन अधिक शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यानंतर आज शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. ही परिस्थिती शेतकरी आणि देशहितासाठी योग्य नाही. त्यामुळे देशाच्या प्रमुखांनी तातडीने शेतकऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने अखेर या आंदोलनाला हिंसक वळण
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी आज मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. त्यांनी दाखविलेल्या हा संयम अतिशय कौतुकास्पद असून हे देशातील अभूतपूर्व असे आंदोलन आहे. या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने अखेर आज या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या हिंसेचे कोणीही समर्थन करणार नाही. मात्र, अशी परिस्थीती निर्माण होण्याअगोदर यावर तोडगा काढणे अपेक्षित होते. अशा परिस्थितीत मात्र युपीच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला जात होता. तर एकीकडे बैठकांवर बैठका घेतल्या जात होत्या. यासर्व प्रकारानंतर आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीमध्ये मोर्चे काढणे, सत्याग्रह करणे हेच हक्काचे मार्ग आहे. मात्र, त्यातूनही निर्णय होत नसतील तर हे दुर्दैवी असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
हट्टीवादी भूमिका शासनाने सोडवी
देशातील शेतकरी इतक्या दिवासांपासून आंदोलन करत असतांना त्यावर केंद्र शासनाकडून निर्णय होत नाही ही भूमिका योग्य नाही. ही हट्टीवादी भूमिका शासनाने सोडण्याची आवश्यकता आहे. या हट्टीवादी भूमिकेमुळे कोणाचाही फायदा होणार नाही. तर हा प्रश्न असाच प्रलंबित राहील. त्यामुळे केंद्रातील निर्णय घेणाऱ्या नेत्यांनी म्हणजेच देशाच्या पंतप्रधानांनी यात स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांसोबत बसून त्यांच्या वेदना त्यांचे दु:ख समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच हा मार्ग निकाली निघेल, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
राजभवनावर होत आहे तेच राजपथावर होतांना दिसत...
राज्यातही तीच परिस्थिती बघावयास मिळत आहे. जे राजभवनावर होत आहे तेच राजपथावर होताना दिसत आहे. सोमवारी राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी राजभवनावर आले असतांना राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ देऊन त्यांचे निवदेन स्विकारण्याची आवश्यकता होती. राज्यपालांना या आंदोलनाबाबत संपूर्ण माहिती असतांना त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जाने पसंत केले. ही बाब योग्य नाही. दौरे नियोजित असतांना काही वेळी जनहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवर त्यात थोडाफार बदल करण्याची देखील आवश्यकता असते ते राज्यपालांनी करणे अपेक्षित होते असेही छगन भुजबळ म्हणाले.
नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू बाबत जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना...
एकीकडे कोरोनाचे संकट दूर होत असतांना जिल्ह्यात आता बर्ड फ्लूने आपले डोके वर काढले. बर्ड फ्ल्यू बाबत जिल्हा प्रशासन अगोदरपासूनच सतर्क असून त्याबाबत काळजी घेतली जात होती. मात्र आज दुर्दैवाने जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या केसेस आढळून आल्या आहे. याबाबत जिल्हा प्रशासनासोबत फोनद्वारे संपर्क करून योग्य त्याना आवश्यक त्या उपयायोजना करण्याच्या सूचना दिलेल्या असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.