नाशिक - मंगळ यान काँग्रेसच्या काळात सोडण्यात आले होते. मात्र, त्यावेळी महिनाभरानंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने त्याचे देखील श्रेय घेतले होते. स्वतः काही करायचे नाही पण दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे, हे मोदींना बरोबर जमते, अशी टीकाछगन भुजबळ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
ते म्हणाले, इस्रोच्या कामगिरीपेक्षा देशात शेतकऱ्यांना हमी भाव देणे, रोजगार उपलब्ध करून देणे, जीएसटी मधील अडचणी दूर करून व्यापाऱ्यांना मदत देण्यासारखे प्रमुख प्रश्न आहेत. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांच्या यशाचे श्रेय मोदींनी घेऊ नये. देशात अनेक गंभीर प्रश्न असताना पंतप्रधान फक्त श्रेय घेण्याचे राजकारण करत आहेत. एकमेकांच्या उपग्रहावर हल्ले करायचे नाही, असे निर्बंध असल्यामुळे याचा उपयोग काय? असा सवालही भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.
काय आहे प्रकरण
आज सकाळी वैज्ञानिकांनी 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये भारताने 'अँटी सॅटेलाइट मिसाईल'द्वारे (उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र) ३०० किलोमीटर अंतरावरुन एक उपग्रह अवघ्या ३ मिनिटांमध्ये पाडला. ही चाचणी यशस्वी झाल्याने अंतराळातही भारताची सुरक्षा वाढली आहे. याची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी मोदी याचे श्रेय घेत असल्याची टीका केली आहे.