नाशिक - नाशिक शहरात काल एका महिलेचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू झाला. त्यामुळे, शहरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. मांजामुळे पक्षांचाही जीव जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षात नायलॉन मांजामुळे 66 पक्षांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा अधिक पक्षी जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून नायलॉन मांजा हद्दपार करण्याचे फक्त आवाहन होते. मात्र, यावर कठोर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा - कांदा निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
2 वर्षात 66 पक्षांचा मृत्यू, तीनशेहून अधिक जखमी
मकर संक्रांत उत्सवाच्या निमित्ताने नाशिक शहरासह जिल्ह्यात पतंग उडवण्याचा आनंद नागरिक घेत असतात. या आनंदात पतंग उडवण्यासाठी नागरिकांनी पशुपक्षांना हानिकारक असलेल्या मांजाचा वापर करू नये, असे आवाहन नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गरड यांनी केले आहे.
वापरकर्ते आणि विक्रेते यांच्यावर कारवाई करावी
नायलॉन मांजात अडकल्याने अनेक पशुपक्षांना आणि बरेचदा माणसांनादेखील गंभीर दुखापत होते. असाच दुर्दैवी प्रकार नाशिकच्या हिरावाडी भागात राहणाऱ्या भारती जाधव याच्यासोबत झाला. काल नायलॉन मांजाने गळा चिरून त्यांचा मृत्यू झाला. या मांजामुळे प्राण्यांना दुखापत होत आहे. त्यामुळे, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत मांजा विक्री करणाऱ्यांवर, तसेच वापर करणार्यांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी पक्षी मित्रांकडून केली जात आहे. दरम्यान, शहरातील होलसेल व्यावसायिकांकडून नायलॉन मांजाची विक्री होत नसून किरकोळ विक्रेत्यांकडून या मांजाची विक्री केली जात असल्याचे पतंग व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - सरपंचपदासाठी २ कोटींची बोली!.. नाशिकचा व्हिडिओ व्हायरल