नाशिक - कोरोना काळातील तीन महिने परिवहन विभागाचे कामकाज ठप्प झाल्याने, याचा फटका परिवहन विभागाच्या महसूलाला बसला आहे. मागील वर्षी पेक्षा महसुलात 70 कोटींची रुपयांची तूट झाली आहे. मात्र पुढील वर्षात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 14 हजार वाहनांवर केसेस करून महसुलात भर टाकण्याचे उदिष्ट असल्याचे नाशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सागितले.
नाशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर माहिती देताना... कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका जेवढा सर्वसामान्य नागरीकांना बसला तेवढाच शासकीय महसुलाला ही बसला. शासनाला राज्य उत्पादन विभागाबरोबर परिवहन विभागातून देखील दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल मिळत असतो. मात्र कोरोना काळात परिवहन तीन महिने परिवहन विभागाचे कामकाज बंद आल्याने नाशिकच्या परिवहन विभागाला तब्बल 70 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मागील वर्षी 2019 मधील एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यात परिवहन विभागाला 168 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तोच 2020 मधील एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये 96 कोटी रुपये इतका महसूल मिळाला असून यात मागील वर्षीपेक्षा 70 कोटी रुपयांची तूट झाली. मागील वर्षी 2019 मधील एप्रिल ते ऑक्टोबर ह्या महिन्यात 49 हजार वाहनांची नोंद झाली होती. तीच 2020 या महिन्यातील 2020 एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये केवळ 26 हजार वाहनांची नोंदणी झाली आहे.
ट्रान्सपोर्ट वाहनांना टॅक्समध्ये दिलेल्या सूटचा परिणाम कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये एप्रिल ते जून 2020 या महिन्यात परिवहन विभागाचे कामकाज पुर्णतः बंद होते. तसेच सर्वच ट्रान्सपोर्ट वाहन देखील उभी असल्याने ट्रान्सपोर्ट असोसिएशनने शासनाकडे लॉकडाउन काळात ट्रान्सपोर्ट वाहनांनावरील टॅक्स माफ करावा अशी मागणी केली होती. यावर शासनाने एप्रिल ते जून 2020 या काळातील ट्रान्सपोर्ट वाहनांना टॅक्समध्ये 50 टक्के सूट देऊ केल्याने याचा परिणाम देखील शासनाच्या महसुलावर झाला आहे.
वायू पथकांकडून वाहनांची तपासणी नाशिक परिवहन विभागाअंतर्गत वायू पथकांची नेमणूक करण्यात आली असून अनधिकृतपणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या, वाहन फिटनेस नसलेल्या, टॅक्स न भरलेल्या, वाहन इन्शुरन्स नसने, ओव्हर लोड वाहने चालवणाऱ्या बस, ट्रेलर, ट्रक आदींवर कारवाई करण्यात येऊन दंड वसूल केला जाणार आहे. तसेच सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट नसणे अशा वाहनांवर देखील कारवाई करण्यात येणार असून पुढील वर्षभरात 14 हजार केसेस दाखल करण्याचे उदिष्ट नाशिक परिवहन विभागाचे आहे.
पुढील पाच महिन्यात नवीन वाहनांची होईल नोंद नाशिक परिवहन विभागाला सर्वधिक महसूल हा वाहन नोदणीतून होतं असतो. मात्र लॉकडाउन काळात तीन महिन्यात एकही नवीन वाहनाची नोंदणी न झाल्याने परिवहन विभागाच्या महसुलात 70 कोटी रुपायांची तूट निर्माण झाली. मात्र आता अनलॉक काळात हळूहळू शहरातील अर्थचक्र सुरू होत असून नवरात्र उत्सव काळात अनेकांनी नवीन वाहने खरेदी केली. तसेच पुढे असलेल्या दिवाळीत आणि नवीन वर्षात आणखीन वाहने खरेदी होऊन त्यातून शासनाला महसूल मिळेल, असा विश्वास नाशिक परिवहन विभागाचा आहे.