नाशिक Nashik rain News : नाशिकमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. अचानक आलेल्या या पावसामुळं अनेकांची तारांबळ उडाली. नाशिक शहरात पावसानं हजेरी लावली तर जिल्ह्यातील सिन्नर, निफाड तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीटदेखील झाली. दरम्यान, अवकाळी पावसामुळं आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पावसामुळे द्राक्ष, कांदा पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय.
खरीप हंगामातील पिकांचं नुकसान : नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या अनेक ठिकाणी पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. नोव्हेंबरच्या हिवाळ्यात शेवटच्या आठवड्यात सुद्धा पावसाचं काही ठिकाणी आगमान झालं आहे. तसंच निफाड तालुक्यात जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळं शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण दिसतंय. या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. मात्र, खरीप हंगामातील पिकांचं नुकसान होणार आहे. हवामान विभागानं 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता.
द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान : दिंडोरी, चांदवड भागात सध्या द्राक्ष पीक फुलोऱ्यात असून डिपिंग थिनिंगची कामं सुरू होती. मात्र, वादळी वारा, गारपीट आणि पावसामुळं आता मोठ्या प्रमाणात द्राक्षमणी गळल्यानं नुकसान झालंय. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळं बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोमॅटो पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. तर मिरची, कारले, भोपळे आदी भाजीपाल्याचंदेखील नुकसान झालं आहे. पुढील दोन तीन दिवसात नुकसानीची तीव्रता जाणवणार आहे. तसंच ऊस तोडणी कामगारांचे पावसामुळं मोठे हाल झालेत. पावसामुळं कारखान्याचा गळीत हंगामही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम भागात भाताचं नुकसान झालं आहे. अगोदरच परतीचा पाऊस न झाल्यानं उत्पादन घटलं असताना अवकाळीनं उरलेल्या पिकांचंही नुकसान केल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. त्यामुळं शासनानं त्वरित सरसकट पंचनामे करत पीकविमा नुकसान भरपाई तसंच शासकीय नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा -