नाशिक - ऑनलाइन रम्मीच्या नादात एका मुलाने वडिलाचे तब्बल साडेदहा लाख रुपये उधळल्याचे समोर आले आहे. आपली चोरी पकडली जाईल, या भीतीने त्याने ऑनलाइन व्यवहाराद्वारे बँक खात्यातील पैशांची चोरी झाल्याची तक्रार सायबर पोलिसांत दाखल केली. मात्र, पोलिसांनी काही तासांतच मुलाचा बनाव उघडकीस आणला. या घटनेनंतर वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विकी सलेकपाल धिंगण (वय - 24, रा. जयभवानी रोड, नाशिकरोड) असे मुलाचे नाव आहे. विकीनेच 28 मे रोजी सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, त्यांच्या वडिलांनी मूळ गाव मोरादाबाद (उत्तर प्रदेश) येथील जमीन विकून नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी 18 लाख 59 हजार 40 रुपये पंजाब नॅशनल बॅंकेत जमा केली होती. त्या बॅंकेच्या त्या खात्याशी विकी याचा मोबाइल संलग्न होता. मात्र, त्याने मे महिन्यातील बँक व्यवहार तपासले असता खात्यातून 10 लाख 67 हजार 138 रुपये परस्पर काढल्याचे निदर्शनास आले. त्याने सायबर पोलिसांत धाव घेत ऑनलाइन भामट्यांनी बॅंकेच्या खात्यातून ही रक्कम काढून घेतल्याची तक्रार केली होती. सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी तपासात विकीचे बिंग फोडले आणि त्यास अटक केली आहे.
विकी याला रमी जुगार खेळण्याचा नाद होता. त्यामुळे त्याने वडिलांच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन साडेदहा लाखांची रक्कम रमी खेळात उडविले. हे लपविण्यासाठी त्याने खोटी तक्रार केली. मात्र, सायबरच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला. संशयिताने रमीसाठी कधी दोन, पाच, सात तर कधी दहा हजार रुपये याप्रमाणे वडिलांच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन पैसे रमी जुगारावर उधळले. सायबर तपासात पैसे रमी गेमवर गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अधिक तांत्रिक तपास केला असता, पैसे वर्ग झाल्यानंतरचे मोबाइल संदेश विकीच्याच मोबाइलवर गेल्याचे समोर आले.
जमीन विकून नाशिकमध्ये घरासाठीची रक्कम मुलानेच रमीमध्ये गमावल्याचे ऐकून सकेलपाल धिंगण यांना धक्का बसला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.