नाशिक - जिल्ह्यातील सटाणा, नांदूर शिंगोटे, वावी भागात घरफोड्या करून पसार होणाऱ्या सीमेजवळील गुजरात राज्यातील 'भाभोर टोळी'ला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. या टोळीतील दोघे पोलिसांच्या हाती लागले असून दोन जण फरार झाले आहेत. अटक केलेल्या दोघांनी नाशिक जिल्ह्यात ७ ते ८ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. कांतिभाई मंडले, नानु मंडले, मांदो भाभोर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर, विनू भाभोर आणि देवला भाभोर हे संशयित मात्र फरार झाले आहेत.
देवदर्शनच्या नावाने महाराष्ट्रात प्रवेश करून घरफोड्या करत गुजरातमध्ये पळून जाणाऱ्या टोळीमुळे नाशिक ग्रामीण पोलीस चक्रावून गेले होते. अशातच पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात घरफोडी झालेल्या ठिकाणांची सखोल चौकशी केली. येथील सीसीटीव्ही तपासताना त्यांच्या हाती धागेदोरे लागले ह्यावरून तपासाचे चक्र फिरवत, गुजरातमध्ये आरोपी असल्याची माहिती पोलिसांना समजली. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पोलीस निरीक्षक केके पाटील, सहायक निरीक्षक स्वप्निल राठोड यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथक तयार करून गुजरातच्या दिशेने रवाना केले.
हेही वाचा - निरोगी आयुष्यासाठी आज हजारो नाशिककर भल्या पहाटे धावले
३ दिवस गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात पोलीस पाळत ठेऊन होते. येथील स्थानिक नागरिकांकडून माहिती जाणून घेत संशयित कांतिभाई मंडले, नानु मंडले, मांदो भाभोर यांना पोलीसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. यात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा, नांदूर शिंगोटे, वावी वावी भागात ७ ते ८ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. यातील विनू भाभोर, देवला भाभोर फरार झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. ह्या आधी गुजरातमध्ये भाभोर टोळीवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोड्यांचे ३७ गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा - तुरे फुटल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त