नाशिक - महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील पाच खासगी लॅबवर बंदी घातली आहे. कोरोना काळामध्ये चुकीचे अहवाल देणे, रुग्णांचे चुकीचे पत्ते छापणे, यामुळे शहरातील पाच नामांकित लॅबला महापालिकेने दणका दिला आहे. तसेच अशा पद्धतीने आणखी काही लॅबदेखील महापालिकेच्या रडारवर आहेत.
कोरोना काळात सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी लॅब चालकांनाही कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या चाचणीनंतर जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या नातेवाईकांना क्वारंटाइन करणे यासाठी या रुग्णांचा संपूर्ण अहवाल, त्यांचा पत्ता, महापालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक लॅब चालकांनी कामामध्ये हलगर्जीपणा केला. त्यांच्यामार्फत रुग्णांचे चुकीचे पत्ते टाकणे, अर्धवट माहिती भरणे असे प्रकार सुरू होते. सुरूवातीला महापालिका प्रशासनाने या लॅब चालकांना समज दिली. मात्र, नंतर त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने सोमवारी शहरातील पाच नामांकित लॅब बंद करण्यात आले आहेत.
तर काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील काही खाजगी रुग्णालय कोरोना बाधितांकडून वाढीव बिले आकारात असल्याने शहरातील सुमारे 40 खासगी रुग्णालयांवर ऑडिटर बसविण्यात आले आहे. आतापर्यंत कोविड रुग्णांकडून घेण्यात आलेल्या वाढीव बिलातील सुमारे 27 लाखांची अतिरिक्त रक्कम संबंधितांना परत करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. तर अशाप्रकारे शहरातील काही आणखी देखील लॅब रडारवर असून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. यामुळे शहरातील बेजबाबदार लॅब चालकांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा - 5000 बेडच्या रुग्णालयासाठी फक्त एक निविदा; पालिकेकडून 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
कोरोनाच्या या काळात मुजोरपणा करून बेजबाबदारपणे वागणाऱ्या लॅब चालकांमुळे सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.