नाशिक - दरवर्षी पावसाळ्यात शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. पावसाळ्यात अनेक धोकादायक वाडे पडतात. यामुळे अनेकांचा बळीही जातो. काही दिवसांपूर्वीच भद्रकाली परिसरात एक जुना वाडा कोसळल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. धोकादायक वाड्यांतील रहिवाशांना नोटीस बजाहूनही अनेक नागरिक हे वाडे खाली करत नसल्यामुळे दुर्घटनांमध्ये जीवितहानी होते. या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महानगरपालिकेने शहरातील 1 हजार 32 धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
दरवर्षी महानगरपालिका शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करून जून्या धोकादायक वाड्यांच्या मालकांना आणि रहिवाशांना नोटीस देते. यावर्षी कोरोनाच्या कामात प्रशासन गुंतलेले असूनही अतिधोकादायक वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाडे त्वरित खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जे नागरिक धोकादायक वाडे खाली करणार नाहीत तसे वाडे पाडण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. धोकादायक म्हणून घोषित केलेल्या वाड्यांना महानगरपालिका बोर्ड लावणार आहे. तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी स्वतःहून हे वाडे खाली करावेत, असे आवाहनही मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होतात. यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. अनेकदा पालिका प्रशासनाने सुचना देऊनही नागरिक इमारती खाली करत नाहीत तर कधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेही दुर्घटना होतात. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये झालेल्या भानुशाली इमारत दुर्घटनेत 9 जणांना आपला जीव गमावावा लागला.