नाशिक - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो कमी करण्यासाठी कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानतंर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत मनपाच्या आरोग्य पथकाने गर्दीच्या ठिकाणी कारवाई करत 2 लाख 26 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
हेही वाचा - नाशिक : दगडफेक करणाऱ्यांना अद्दल; पोलिसांनी काढली शहरभर धिंड
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 200 रुपयांऐवजी आता 1 हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत शहरातील शालिमार, मेनरोड, पंचवटी, रविवार कारंजा नाशिकरोड आदी गर्दीच्या ठिकाणी बेशिस्तपणे मास्क न घालताच फिरणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी एक हजाराचा दंड ठोठावला असून, आतापर्यंत 2 लाख 26 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
एक हजार रुपये दंडामुळे नागरिक नाराज
नाशिकमध्ये मास्क न घालणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे, आता प्रशासनाने कडक नियम केले असून, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना बाबतच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना आधी असलेल्या 200 रुपये दंडाच्या रक्कमेत वाढ करत थेट 1 हजार रुपये दंड करण्याचे निर्देश प्रशासनाला केले. मात्र, या निर्णयामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून अनेक ठिकाणी मनपाच्या आरोग्य पथकासोबत नागरिकांचे वाद होत आहेत.
मोफत मास्कचे वाटप
कोरोनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी धोंगडे नगर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अतुल धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी नाशिक रोड परिसरात मोफत मास्कचे वाटप केले. नाशिक रोड, बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक, मुक्तिधाम परिसर आदी गर्दीच्या ठिकाणी मास्कचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा - नाशिक मनपात तक्रारदारांची नावे सार्वजनिक होत असल्याने तक्रारदारांना मनस्ताप