नाशिक - स्मार्ट सिटी प्रकल्प सुरुवातीपासूनच वादात आहे. आता या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभाराविरोधात महानगरपालिकेच्या महापौर सतीश कुलकर्णी यांनी दंड थोपटले आहेत. थविल यांच्या बदलीसाठी महापौरांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.
थविल यांना कार्यमुक्त करा -
केंद्रात, राज्यात आणि नाशिक महानरपालिकेत भाजपाचे सरकार असताना अनेक लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून नाशिक शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्याचा सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतला होता. मात्र, भाजपाचा हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या मनमानी कारभारामुळे सत्ताधारी भाजपाची कोंडी झाली आहे. मात्र, महापौरांनी ही कोंडी फोडत या प्रकल्पाचे अध्यक्ष सिताराम कुटे यांच्याकडे थविल यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. ठेकेदारांना परस्पर मुदत वाढ देणे, सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज सुरू करणे, अशा तक्रारी महापौर सतीश कुलकर्णी केल्या आहेत.
पालकमंत्री म्हणाले चौकशी करू -
महापौरांच्या तक्रारीनंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली. भाजपानेच त्यांच्या सत्ताकाळात हा प्रकल्प राबवला आहे. नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी मिळत आहेत. विविध समाज माध्यमांतून देखील दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. आता तर नाशिकच्या महापौरांनीच तक्रार केली आहे. म्हणजे यात नक्कीच तथ्य असू शकेत. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालू, असे भुजबळ म्हणाले.
कामचुकार ठेकेदाराचा दंड केला माफ -
नाशिक शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आजवर केवळ नूतनीकरणाची कामे झाली आहेत. अद्याप एकही नवीन प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही. शहरातील अशोक स्तभं ते त्र्यंबक नाका हा 1 किलोमीटरचा रस्ता उभारणीसाठी 17 कोटी रुपये ठेकेदाराला देण्यात आले. पावणे तीन वर्षे उलटूनही या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या ठेकेदाराला 80 लाख रुपयांचा दंडही करण्यात आला. मात्र, थविल यांनी एकाही संचालकाला विश्वासात न घेता या ठेकेदाराचा 80 लाखाचा दंड माफ केला. त्यांच्या मनमानी कारभारामुळे महापौरांनी थविल यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. महापौरांच्या पत्रानंतर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष सीताराम कुंटे हे प्रकाश थविल यांच्याबाबत काय निर्णय घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.