नाशिक - मनमाड नगरपालिकेतर्फे सध्या शहरातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले गेले आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पालिकेच्यावतीने या खड्ड्यात मुरुमाच्या नावाखाली फक्त माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर पुन्हा चिखलाचे साम्राज्य तयार होते. या कामाची दखल आता शहरातील युवा पिढीने हाती घेतली असून या कामाचा व्हिडिओ तयार करून सध्या सोशल मीडियावर पालिकेच्या या कामाची खिल्ली उडवली जात आहे.
मनमाड शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली होती. याबाबत वेळोवेळी तक्रारी गेल्यानंतर पालिकेकडून या रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली गेली. मात्र, या डागडुजीत मुरुमाच्या ऐवजी फक्त मातीचा वापर होत आहे. यामुळे पाऊस आल्यावर पुन्हा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन खड्डे पुन्हा तयार होत आहेत. याबाबत कुणीही काही बोलण्यास तयार नसल्याने शहरातील तरुण वर्गाने या कामाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून पालिकेला ट्रोल करण्याचा सपाटा लावला आहे. 'गोलमाल हैं, भाई सब गोलमाल है' या गाण्याला कामाच्या व्हिडीओशी एडिट करून सध्या फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटरवर व्हायरल केला जात आहे. यानंतर तरी पालिकेने कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणीही सोशल मीडियावर केली जात आहे.
मनमाड शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र, पालिकेकडून खडी, डांबर या वस्तू न वापरता फक्त माती टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन पुन्हा खड्डे तयार होतील. त्यामुळे किमान पालिकेने या खड्ड्यात खडी टाकून रोलर फिरवावे, अशी मागणी जनता करत आहे.