नाशिक - कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी परिसरातील जंगलाती गावठी दारू अड्ड्यावर कळवण पोलिसांनी छापा टाकून, दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने दारूची दुकाने बंद आहेत. सोमवारी संध्याकाळी कळवण पोलिसांनी छापा टाकून, 100 लिटरचे 8 ड्रम अशी सुमारे ३२ हजार रुपये किंमतीची ८०० लिटर गावठी दारू पोलीस कारवाईत मिळून आली.
ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यानुसार नांदुरी परिसरातील जंगलात गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांंनी त्या ठिकाणची केमिकल तपासणीसाठी थोडी दारू काढून, उर्वरित दारू जागेवर नष्ट करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी योगेश गवळी, शिवाजी शिंदे, अशोक ब्राम्हने यांनी ही कारवाई केली.