नाशिक - 'शेती व बांधकाम व्यवसायाने माणसाच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यामुळे कोरोनाकाळात थांबलेला बांधकाम व्यवसाय सुरू करून अर्थचक्राला गती देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या डीसीपीआरच्या निर्णयाने बांधकाम क्षेत्राला उभारी दिली' असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. कोर्टयार्ड मॅरिएट येथे आयोजित क्रेडाई शिखर परिषदेत भुजबळ बोलत होते.
हेही वाचा - भाजपच्या समरजित घाटगे यांनी व्यक्त केल्या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा
स्टॅम्प डयुटीवर सूट दिल्यामुळे बांधकाम क्षेत्राच्या विकासाला गती
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, शासनाने स्टॅम्प डयुटीवर सूट दिल्यामुळे बांधकाम क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली. तसेच, गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला डीसीपीआरचा प्रश्न शासनाने सूक्ष्म अभ्यास करून सुटसुटीत पध्दतीने मांडला आहे. यात पार्किंग क्षेत्रासाठी असलेले क्लिष्ट नियम सोपे केले असून यामुळे बांधकाम व्यावसायिकांना जास्तीचे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. तसेच ग्राहकांनाही कमी दराने घरे उपलब्ध होणार आहेत. या नवीन डीसीपीआरमध्ये सायकल ट्रॅकचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने याचा फायदा जिल्ह्याच्या पर्यावरण पूरक व्यवसायाला होणार असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
क्रेडाईने केलेले काम कौतुकास्पद
समाजसेवेत क्रेडाईचे योगदान मोलाचे असून, शासनाच्या मदतीला देखील त्यांचा हातभार आहे. कोरोनाच्या कठीण काळात क्रेडाईने केलेले काम कौतुकास्पद आहे. क्रेडाईने भविष्यात नाशिकमध्ये अजून उत्तमोत्तम इमारती उभारव्यात असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीष मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव पारख, माजी सचिव महेश झगडे, सुनील कोतवाल, रवी महाजन, अनिल महाजन, डॉ. कैलास कमोद उपस्थित होते.
हेही वाचा - राज्यमंत्री बच्चू कडू अण्णा हजारे यांच्या भेटीला