नाशिक - दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. शेतकरी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरोधात लाखो शेतकरी दिल्ली जिल्ह्याच्या सीमेवर ठिय्या देऊन गेल्या पाच दिवसांपासून बसले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट आधार भावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीनही शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी विधेयक पुढे रेटण्याचे कार्यक्रम बंद करा, अशा प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन सुरू आहे.
नाशकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन -
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (गुरुवारी) महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तहसील कार्यालयावर निषेध करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान संघर्ष व समन्वय समिती, यासह वेगवेगळ्या शेतकरी आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येईल केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी डफली वाजवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच केंद्रविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - ओबीसी मोर्चा : आंदोलन स्थगित, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची पोलिसांनी केली सुटका..
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ दिलेल्या येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजप ताकदीच्या जोरावर दडपून पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधुर सोडून, हायवेवर खड्डे करून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून, आंदोलन दडपण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले नाही तर नाशिक जिल्ह्यात मोठे आंदोलन उभे राहील, असा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे