नाशिक - एक तीर्थक्षेत्र, पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली होती. यामुळे उद्योजक तसेच पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण होते, शेतमालासाठी कार्गो सेवा असल्याने शेतकरी वर्गही सुखावला होता. पण, ही सेवा बंद पडल्यामुळे नाशिकच्या पर्यटन, उद्योग-व्यवसायावर परिणाम होत आहे.
जेट एअरवेजची ही विमानसेवा अचानक बंद पडली, त्यानंतर इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्यांनी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण, ही विमानसेवा मागील 6 महिन्यांपासून खंडीतच राहिली. खासदार हेमंत गोडसे यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, बंद पडलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी त्यांनी पुन्हा त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आता याचे परिणाम उद्योग-व्यवसाय व पर्यटनावर होत असल्याची खंत पर्यटक व्यवसायिक दत्ता भालेराव यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - थंडी वाढताच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा, पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
दिल्ली हे राजधानीचे ठिकाण असल्याने अनेक प्रवाशांना शिर्डी अथवा मुंबईहून विमानाने जावे लागते. यात फारसा वेळही खर्च होत आहे. सरकारने नाशिक-दिल्ली विमानसेवा सोबतच बंद पडलेली नाशिक-मुंबई विमानसेवाही सुरू करावी अशी, मागणी नाशिककर प्रवाशांनी केली आहे.
हेही वाचा - कादवा सहकारी साखर कारखान्याचे विक्रमी गाळप; सभासदांनी केला अध्यक्षांचा सत्कार