नाशिक - निराधार बहिणीला सांभाळण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून शेतीचे हक्कसोड पत्र लिहून घेणाऱ्या भावाला जिल्हाधिकारी सूरज मांडरे यांनी दणका दिला आहे. भावाने बहिणीची फसवणूक केल्याचे लक्षात येताच मांढरे यांनी हे हक्कसोड पत्र रद्द केले आहे. विशेष म्हणजे, महिलेच्या भावानेच जिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण नेले होते.
आरोपीने काही वर्षांपूर्वी आपल्याच निराधार बहिणीला सांभाळण्याचे आमिष दाखवत तिच्या जमिनीचे हक्कसोड पत्र लिहून घेतले. त्यानंतर भावाने बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी नाकारली. पीडित बहिणीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे भावाविरोधात तक्रार अर्ज केला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आरोपीने पीडितेला प्रति महिना दहा हजार रुपये द्यावेत, असे सांगितले. मात्र, या निकालाबाबत आरोपी भाऊ समाधानी नव्हता. त्याने हे प्रकरण जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासमोर नेले. मांढरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता आरोपीने पीडितेची फसवणूक केल्याचे लक्षात आले. मांढरे यांनी तत्काळ शेतजमिनीचे हक्कसोड पत्र रद्दकरून पीडितेला न्याय मिळवून दिला.
याबाबत जमिनीचे सातबारा उतारे देखील तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे हक्कसोडपत्र रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.