नाशिक : राज्यासह नाशिक शहरामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहे. सोशल मीडियावरील तरुणी, महिला आणि मुलांच्या ब्लॅकमेल प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबरदूत ही संकल्पना महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. समाजात घडणाऱ्या अनुचित प्रकाराला 'सायबरदूत' या उपक्रमामुळे नक्की आळा बसेल, असे मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
ऑनलाईन फसवणुकीच्या घटना : सध्या सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप तसेच ऑनलाइन पध्दतीचा वापर करून होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशात काही शिक्षित नागरिक वगळता अनेकांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याबाबत अज्ञान आहे. त्यामुळे असे नागरिक सोशल मीडियाच्या गुन्हेगारीला बळी पडत आहे. यासाठी नाशिक पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांची जनजागृती करण्यासाठी 1 हजार सायबरदूतांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कॅप्सूल कोर्सद्वारे प्रशिक्षण देणार : प्रशिक्षीत सायबरदूतांना सायबर पोलिसांकडून प्रशस्तीपत्र आणि 'सायबरदूत' बॅच देण्यात येत आहे. हे सायबरदूत शहरातील शाळा, महाविद्यालय, कंपनी, संस्था, रहिवासी परिसर या ठिकाणी सायबर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार आहे. त्यात मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन साधनांच्या माध्यमातून सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करणार आहे. प्रशिक्षित झालेल्या सायबरदूतांना भविष्यात कॅप्सूल कोर्सद्वारे तज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. सोशल मीडिया माध्यमाचा वापर, वाढते शहरीकरण तसेच पाश्चात्त्य संस्कृतीने सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. हा सायबरदूत उपक्रम नागरिकांमध्ये विश्वास आणि संरक्षणाची भावना अधिक बळकट करण्यास उपयुक्त ठरेल, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.
युवकाला 16 लाखांचा गंडा : वर्क फ्रॉम होमचा शोध घेणाऱ्या सिडकोतील युवकास 16 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या उत्तमनगर येथील भूषण राजपूत याच्या तक्रारीनुसार, तो ऑनलाइन पद्धतीने वर्क फ्रॉम होमचा शोध घेत होता. जून महिन्यात एका संशयिताचा मोबाईलवर कॉल आला. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून चांगले पैसे मिळतील, असे आमिष त्याला दाखवले. त्यासाठी त्यांना टेलिग्रामवरून दिलेली टास्क पूर्ण करण्यास सांगितले. संशयिताने दिलेल्या टास्कनुसार राजपूत यांनी लाईक्स देत ऑनलाईन टास्क पूर्ण केले. त्यानुसार त्यांना सुरुवातीला काही प्रमाणात पैसेही मिळाले. त्यानंतर ट्रान्स पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या पैशाची माहिती डॅश बोर्डवर दिसू लागली. ठराविक दिवसांनी ही रक्कम काढता येईल, असे संशयिताने सांगितले.
सायबर पोलिसात तक्रार : राजपूत यांनी मुदतीचे दिवस पूर्ण झाल्याचे बघून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या खात्यावर पैसे आले नाही. संशयिताने विविध कारणाने देत पैसे बँकेत भरण्यास सांगितले. राजपूत यांनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 16 लाख 3 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केले, तरी देखील पैसे मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.
हेही वाचा :