नाशिक : रविवारी पहाटे नाशिकरोड भागातील सामनगाव रोड परिसरात रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राजवळील एटीएम मशीन चोरट्यांनी चोरून नेले. नाशिकरोड भागातील सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटर जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या ठिकाणी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी होत नसल्याने चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद : चार चोरट्यांनी पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास पिकअप वाहनातून येऊन एटीएम मशीन चोरून नेले. भल्यापहाटे झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी भेट देऊन तपास करत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून एटीएममध्ये किती रक्कम होती, याबाबत अद्याप निश्चित आकडा समजू शकलेला नाही. पोलीस एटीएम चोरणाऱ्या संशयीतांचा शोध घेत आहेत.
गावकऱ्यांनी एटीएमसाठी जागा दिली होती : सामनगाव, चाडेगाव या भागात रेल्वे सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र असून तिथे भारतभरातून अधिकारी आणि जवान प्रशिक्षणासाठी येतात. हा भाग ग्रामीण परिसरात येत असल्याने पैसे काढण्याकरता रेल्वे सुरक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना त्रास होत असे. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी एटीएम बसवण्यासाठी चाडेगाव ग्रामस्थांना विनंती केली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी एटीएमसाठी ही जागा उपलब्ध करून दिली होती.
परिसरात गुन्हेगारी वाढली : दोन दिवसांपूर्वीच परिसरात भरदिवसा एक व्यक्ती एका महिलेचा खून करून हत्यार घेऊन उघडपणे पळून गेला होता. तर काही दिवसांपूर्वी एका इंजिनिअरने प्रेमभंग झाला म्हणून गावठी कट्ट्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. त्याने तो गावठी कट्टा कुठून आणला होता, याचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले होते.
हेही वाचा :