नाशिक - दोन दिवसांपूर्वी लागू करण्यात आलेली कांदा निर्यातबंदी तातडीने हटवावी, या मागणीसाठी आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने सोमवारी (१४ सप्टेंबर) कांद्यावर निर्यातबंदी लागू केली. ही निर्यातबंदी तातडीने हटवावी, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना राजकीय पक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. बंदीमुळे निर्यातीसाठी पाठवलेला शेकडो टन कांदा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत असणारा बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कांदा निर्यातबंदी तातडीने मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभरात आंदोलने करण्यात आली. नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्यावतीनेही जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.