नाशिक - कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याकडून अथक परिश्रम घेण्यात आले आहेत. या परिश्रमांचे फलित म्हणून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले. येणाऱ्या काळात आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी नवीन वर्षाचे स्वागत घरात राहूनच करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात -
सरत्या वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या विविध संकटांना आपण अजूनही सामोरे जात आहोत. कोरोनामुळे आपल्या सर्वांचे जीवनमान पूर्णपणे बदलून गेले आहे. या संकट काळात सावरण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले, तसेच अनेकांनी दिलेले मोलाचे योगदानही दिले. नाशिक जिल्ह्यात सध्या मृत्यूचे प्रमाण कमी असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यामुळेच जिल्ह्यातील ११ हजार कोरोना बाधितांचीसंख्या एक हजार ९०० पर्यंत आली आहे. बाधितांची संख्या पूर्णपणे शुन्यावर नेण्यासाठी यापुढेही प्रशासकीय यंत्रणामार्फत प्रयत्न केले जातील. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
इतर देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव -
सध्या इतर देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाय शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही. अशा परिस्थितीत आपणच आपल्यावर काही निर्बंध घालणे गरजेचे आहे. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला मनोरंजनाचे कार्यक्रम घरात राहूनच साजरे करणे आवश्यक आहे. मास्क मुक्त जीवन जगण्यासाठी, तसेच कोरोनाचे लसीकरण पूर्ण करून एक सुदृढ आणि आरोग्यदायी दिर्घायुष्य जगण्याचा संकल्प करून नवीन वर्षाचे स्वागत आपल्या घरातच करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
रात्री ११ वाजेनंतर संचारबंदी -
नववर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी, नैसर्गिक पर्यटन स्थळांवर गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनामार्फत नियमावली तयार करण्यात आली आहे. रात्री ११ वाजेनंतर संचारबंदी लावण्यात आली आहे. ११ वाजल्यानंतर नागरिकांनी घरा बाहेर न जाता प्रशासन व पोलीस यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.