नाशिक - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करने गरजेचे आहे. शासकीय व खासगी लॅबमधील स्वॅब तपासणी अहवालांचे तुलनात्मक विश्लेषण करून कोरोना परिस्थितीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
कोरोना नियमांचे पालन होत नाही -
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हातील कोरोना उपाययोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. इतर शहरांमधील रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे बंधन येऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा नियमित वापर करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या स्वॅब तपासणीतील पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 28 टक्के तर शासकीय लॅबमधील पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 5 टक्के येत असल्याने याबाबत प्रशासनामार्फत पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या आहेत.
10 मार्चनंतर सर्वसामान्यांना कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता -
गेल्या 10 दिवसात जिल्ह्यातील रुग्णसंख्येत झालेली वाढ चिंताजनक असल्याचे भुजबळ म्हणाले. लॉकडाऊन शिथिल केल्यापासून नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य नाशिककरांसाठी 10 मार्चनंतर कोरोना लस उपलब्ध होईल, अशी शक्यता देखील पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली.
‘सिरो सर्व्हे’चे काम अंतिम टप्प्यात -
कोरोना लस घेतल्याने कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य विसरून न जाता नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिककरांना केले आहे. रूग्णांमधील हर्डइम्युनिटी तपासण्यासाठी शहरात करण्यात येणाऱ्या ‘सिरो सर्व्हे’चे काम अंतिम टप्प्यात असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.